अध्यक्षांचा संदेश


सस्नेह नमस्कार!
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापुरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ऐतिहासिक परंपरा असलेली ‘मएसो’ २०१९-२० या वर्षात शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या १५९ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने शिशुशाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून कौशल्य विकासापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये असलेल्या ७५ शाखांच्या माध्यमातून सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शिक्षणाकडे केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून न बघता त्यापलीकडे जाऊन चांगला माणूस आणि सजग नागरिक घडविण्यावर ‘मएसो’ चा भर राहिला आहे. यातूनच जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान यशाने देशाचा आणि संस्थेचा नांवलौकीक वाढविणाऱ्या नामवंत माजी विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा निर्माण झाली आहे.

संस्थेने कायमच कालसुसंगत शिक्षण देण्याचा आग्रह कायम राखला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत, व्यक्तिमत्वाच्या विकासात क्रमिक शिक्षणाबरोबरच कलांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मानवी जीवनातील कलेचे नेमके स्थान काय? या प्रश्नाचे यथार्थ उत्तर आपल्या देशाच्या सांस्कृतिक वाटचालीत बघायला मिळते. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन न राहाता मानवी जीवनाच्या विकासातील एक महत्वाचे आणि अपरिहार्य अंग राहीले आहे. आपल्या परंपरेतील संगीत-नृत्य-नाट्य आदी कलांच्या माध्यमातूनच आपण जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विविध समाज समूहांच्या मनात आपला देश आणि आपली संस्कृती यांबद्दल आपुलकीचे, आदराचे स्थान निर्माण करु शकलो आहोत.

आत्मिक शांतीचा, अवर्णनीय आनंदाचा अनुभव देणाऱ्या या कलांचे शास्त्रशुद्ध शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली आहे.

या महाविद्यालयात विविध कलांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचा ‘सूर-ताल-लय’ निश्चितच गवसेल अशी खात्री बाळगतो. महाविद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी माझ्या अनेकानेक शुभेच्छा!

– आर्कि.राजीव सहस्रबुद्धे
अध्यक्ष, नियामक मंडळ,
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी